मावळ जनसंवाद, दि. 23 :–
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवाच्या निमित्ताने कोंडीवडे (नामा) येथे दि. 21 नोव्हेंबर 2025 व 22 नोव्हेंबर 2025 रोजी दोन दिवसीय धार्मिक, सांस्कृतिक आणि लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ढोल–ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि भक्तांच्या "जय भैरवनाथ" जयघोषात श्री भैरवनाथ देवाची पालखी भव्य मिरवणुकीसह काढण्यात आली. या पालखी सोहळ्याने गावात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यात्रेमध्ये विविध खेळणी दुकाने, रेवड्या, भेळ, आइसक्रीम, ज्यूस आदी स्टॉल्समुळे जत्रेला चैतन्य प्राप्त झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच जत्रेमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे अखंड महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले सोमनाथ कलापथक, सडवली यांचे “रंगीत संगीत भजनी भारुड” कार्यक्रम. दोन दिवस चाललेल्या या सादरीकरणांमध्ये प्रभावी भारुड, सामाजिक संदेशांनी युक्त व विविध लोकपरंपरांचे दर्शन घडवणारी गाणी सादर करण्यात आली.
विशेष म्हणजे मावळ तालुक्यातील बैलगाडी शर्यतींना असलेले ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कलापथकाने त्यांच्या लोककला सादरीकरणात “पाटलांचा बैलगाडा” यांसारखी मावळच्या संस्कृतीची ओळख जपणारी गाणी सादर केली. या गाण्यांनी उपस्थित प्रेक्षकांमध्ये विशेष उत्साह निर्माण केला आणि पारंपरिक मावळी संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली.


0 Comments