मावळ जनसंवाद:
दि.21:-
निगडीतील भक्तीशक्ती चौकातून २ नोव्हेंबरला पहाटे निघालेल्या युवराज पाटील, आनंद गुंजाळ, अजय दरेकर आणि राघव पांडा या चार सायकलिस्टनी सेल्फ सपोर्ट पद्धतीने तब्बल १८५० किमीचा पुणे–जगन्नाथ पुरी हा लांब आणि आव्हानात्मक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. कोणतीही सपोर्ट व्हॅन नाही, फक्त सायकल आणि त्यावरच ठेवलेलं १२–१४ किलोचं आवश्यक सामान—याच्या बळावर त्यांनी ही कठीण मोहीम साध्य केली.
पहिल्याच दिवशी २३० किमी पार करत त्यांनी मोहोळ गाठलं आणि पुढचा प्रवास मोहोळ–बसवकल्याण–हैदराबाद–खमाम–कोयालगुडेम–श्रीकाकुलम–छत्रपूर अशा मार्गाने करत अखेर ९व्या दिवशी श्री जगन्नाथ पुरी धामात प्रवेश केला. या सफरीत त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशी पाच राज्ये ओलांडली.
पावसाचा मारा, तळपणारं ऊन, उलट दिशेचा वारा, पंक्चर, रस्त्यांच्या अडचणी—चॅलेंजेस भरपूर होती; पण श्रद्धा, जिद्द आणि एकमेकांचे सहकार्य यांच्या जोरावर ते सातत्याने पुढे सरकत राहिले. “पुरीत पोहोचताच थकवा विसरला; मनाला एक वेगळी ऊर्जा मिळाली,” असं या सायकलिस्टनी सांगितलं.
प्रवासादरम्यान त्यांनी “झाडे लावा”, “पाणी वाचवा”, “बेटी बचाव” यांसारखे सामाजिक संदेश देत स्थानिकांशी संवाद साधला. यापूर्वीही या टीमने पुणे–कन्याकुमारी, पुणे–सोमनाथ, उज्जैन, ओंकारेश्वर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर अशा अनेक धार्मिक राईड्स केल्या आहेत.
त्यांच्यासाठी “पुरी धाम राईड” ही केवळ अंतर जिंकण्याची स्पर्धा नव्हती; तर ती होती शारीरिक ताकद, मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक अनुभवाचा त्रिवेणी संगम.


0 Comments