मावळ जनसंवाद, दि. 14 :
मावळ तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागामध्ये आजही अनेक गावांमध्ये महिलांना घरातील स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी जंगलात जावे लागत आहे. शासनाच्या विविध योजना, गॅस कनेक्शन व पर्यायी इंधन उपलब्ध असूनही प्रत्यक्षात अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक चुलीवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मावळ परिसरात पहाटेपासूनच महिला लहान-मोठी लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जातात. अनेक किलोमीटर अंतर चालत जाऊन डोक्यावरून जड लाकडांचे ओझे वाहून घरी आणावे लागते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून मान, पाठ व कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढले आहे.
पावसाळा, उन्हाळा किंवा थंडी कोणताही ऋतू असो, या महिलांचे कष्ट कमी झालेले नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांची सोय नसल्याने तसेच आर्थिक अडचणीमुळे गॅस सिलिंडर भरणे परवडत नसल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या भागात उज्ज्वला गॅस योजना प्रभावीपणे राबवावी, तसेच पर्यायी इंधनाची सोय करून महिलांना या कष्टातून मुक्त करावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.


0 Comments