Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळात निसर्गाची सोनसळी बहार – पर्यटकांच्या स्वागतासाठी सजलेली डोंगरकपारे

 मावळ जनसंवाद:- नाणे मावळ (ता. मावळ ) – नाणे मावळ परिसर सध्या निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यानंतर डोंगर कपाऱ्यांमध्ये, पडीक रानांमध्ये आणि रस्त्यालगतच्या पठारांवर जणू निसर्गाने पिवळसर सोन्याची शालच अंथरली आहे. हिरव्यागार पार्श्वभूमीवर पिवळी फुले डोलताना पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी पर्वणीच! या भागात सर्वत्र कवळा वनस्पतीची लहान लहान पिवळी फुले नजरेस पडतात. 

वाऱ्यावर हलणारी ही फुले जणू एखाद्या रुपवान स्त्रीच्या डोलणाऱ्या साडीची आठवण करून देतात. वातावरणात पसरलेला वाऱ्याचा मंद स्पर्श, फुलांवरून घळणारे पावसाचे थेंब आणि त्यावर चमकणारे दवबिंदू यामुळे हा परिसर स्वप्नवत भासतो. या भागात केवळ फुलांनीच नव्हे, तर विविध प्रकारच्या रानभाज्या, औषधी वनस्पती आणि रंगीबेरंगी फुलपाखरांनी देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही ठिकाणी क्वचितच दिसणारी ही फुलांची बहार या परिसरात सहजपणे अनुभवता येते.सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने निसर्गप्रेमींना नाणे मावळात भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. याच काळात डोंगरांच्या कडेकपाऱ्यांतून उतरणारा सूर्य, लखलखीत दवबिंदू, हिरव्यागार पानांवरून घसरत जाणारे पाण्याचे थेंब आणि पिवळ्या-हिरव्या रंगांची निसर्गचित्रे मनाला मंत्रमुग्ध करतात.

पर्यटनाच्या दृष्टीने या भागात मोठी शक्यता असून शासनाने लक्ष दिल्यास नाणे मावळ पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकू शकते. येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची मुक्त हस्ते उधळण अनुभवता येते, ज्यात सौंदर्य, शांती आणि समाधान यांचा त्रिवेणी संगम आहे. नाणे मावळ हा खरोखरच निसर्गाचा अमोल ठेवा आहे!

Post a Comment

0 Comments