मावळ जनसंवाद:- मावळ तालुक्यात शेतकऱ्यांना प्रथमच जूनपासून ओल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सततचा पाऊस, बदलत्या हवामानामुळे उसावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नदीकाठासह सर्वच ठिकाणची ऊसपिके अडचणीत आहेत. गतवर्षी पाण्याअभावी व चालू हंगामात अतिपाण्यामुळे ऊस उत्पादन जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी या घटीचा फटका ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांनाही बसणार आहे. मावळ तालुक्यात मे पासूनच अवकाळी, वळीव, मान्सूनपूर्व व मान्सून असा जवळपास साडेतीन महिने व आजअखेर पावसाने मुक्काम हलवलेला नाही. शेतात पाणी साठून राहिल्याने भात पिके काही ठिकाणी धोक्यात आली आहे.तर सर्वच पिकांची वाढ खुंटली. नाणे मावळात लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे ऊसपीकही सततच्या पावसाने व वातावरणातील बदल व वाढत असलेल्या करपा रोगाच्या थैमानाने बाधित झाले आहे. परिणामी उसासह साखरेचे उत्पादन घटण्याबरोबरच कारखान्यांना उसासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



0 Comments