plz See the 01 attachment
नाणे मावळ, दि. १ :-
ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे महिनाभर शेतीपंप बंद; शेतकऱ्यांची पिके धोक्यात, महावितरणच्या कारभाराविरोधात संताप
मावळ तालुक्यातील बुधवडी, वाडीवळे, कांब्रे आणि वळक या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याने गेल्या महिनाभरापासून परिसरातील शेतकऱ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर चोरी गेल्यानंतर संबंधित भागातील शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत.
या घटनेनंतर शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणच्या कामशेत कार्यालयात लेखी व तोंडी तक्रारी केल्या. मात्र तक्रारींना महिनाभराचा कालावधी उलटूनही नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने भात पेरणी केली आहे. बियाणे, खत, मशागत आणि मजुरी यासाठी हजारो रुपये खर्च करूनही पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतीपंप बंद असल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी शेतात पोहोचत नसून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे, ट्रान्सफॉर्मर चोरीस गेल्यानंतर तातडीने पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित असताना महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात नवीन डीपी बसविण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून आगामी हंगामही संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवडी, वाडीवळे, कांब्रे आणि वळक परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
परिसरातील शेतकरी आता प्रशासनाच्या तातडीच्या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत.
नाणे मावळ :- श्री. अतुल तुकाराम चोपडे पाटील
मो. ९८२३९३५४२४


0 Comments