Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

“आमच्या दादांच्या लग्नाला यायचं हं”

 मावळ जनसंवाद 
“आमच्या दादांच्या लग्नाला यायचं हं” — बदलत्या काळात लग्नपत्रिकेची परंपरा हरवत चालली
“आमच्या दादांच्या/ताई यांच्या लग्नाला यायचं हं” हा शब्दप्रयोग पूर्वी प्रत्येक लग्नपत्रिकेतील जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा भाग असायचा. लग्नपत्रिका घेऊन घराघरात जाऊन नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिले जायचे. त्या पत्रिकांवर विविध देव-देवतांचे फोटो, शुभचिन्हे, स्वस्तिक, मंगल कलश यांसह कुटुंबातील ज्येष्ठ, मानकरी आणि नातेवाईकांची नावे सन्मानाने छापली जात असत. विशेष म्हणजे पत्रिकेवर आपले नाव असल्यामुळे संबंधित मंडळी आवर्जून लग्नाला उपस्थित राहत आणि त्या समारंभाची शोभा वाढवत असत.
मात्र, कोरोना काळानंतर या परंपरेत मोठा बदल झाला आहे. सध्या लग्नपत्रिकेचे स्वरूप बदलून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, सोशल मीडिया पोस्ट आणि डिजिटल बॅनरवर निमंत्रण दिले जात आहे. डिजिटल निमंत्रणामध्ये सर्वांची नावे समाविष्ट नसतात, तसेच प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्याची परंपराही कमी झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत नसल्याची खंत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
तंत्रज्ञानामुळे निमंत्रण देणे सोयीचे झाले असले तरी पारंपरिक लग्नपत्रिकेमधील आपुलकी, मान-सन्मान आणि “लग्नाला यायचं हं” हा प्रेमळ आग्रह आजही अनेकांच्या मनात कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments