मावळ जनसंवाद, दि. ८ :-
मावळ तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. डोंगर-दऱ्यांमधून वाहणारे ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गावागावांत चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काही गावांमध्ये अनेक तास, तर काही ठिकाणी सलग दोन-दोन, तीन-तीन दिवस वीज नसल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
वीज नसल्यामुळे पीठ गिरण्या बंद पडल्या असून घरगुती वापरासाठी धान्य दळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले जाते पुन्हा बाहेर काढण्यात आले आहे. आधुनिक युगात हरवलेला जातेचा घुर्र... घुर्र... आवाज पुन्हा गावोगावी ऐकू येत असून, महिलांना मोठ्या कष्टाने हाताने धान्य दळावे लागत आहे. एका बाजूला मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला वीजेचा लपंडाव, अशा दुहेरी संकटातही ग्रामीण महिला आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पूर्वी प्रत्येक घरात जाते असायचे. पहाटेच्या वेळी महिला एकत्र बसून धान्य दळत असत. जाते फिरवताना ओव्या म्हणणे, गप्पागोष्टी करणे आणि श्रमातून आनंद शोधणे ही ग्रामीण संस्कृतीची ओळख होती. जातेवर दळलेले पीठ चविष्ट, पौष्टिक आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. काळ बदलला, गिरण्या आणि आधुनिक यंत्रसामग्री आली आणि जाते अडगळीत पडले. मात्र आज निसर्गाच्या संकटाने पुन्हा एकदा या पारंपरिक साधनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
मावळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने केवळ धान्य दळण्याचेच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल नेटवर्क, विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतीची कामे, दुग्धव्यवसाय आणि इतर दैनंदिन व्यवहारही ठप्प होत आहेत. मोबाईल चार्ज नसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी वीज यंत्रणेची योग्य देखभाल झाली असती, तर नागरिकांना इतका त्रास सहन करावा लागला नसता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. पावसाळ्यात ग्रामीण भागात अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुसळधार पावसाच्या संकटात महिलांनी पुन्हा हातात जाते घेतले असून, संकटाच्या काळातही ग्रामीण संस्कृती, कष्ट, स्वावलंबन आणि परंपरेचा वारसा आजही जिवंत असल्याचे हे चित्र मावळ तालुक्यात पाहायला मिळत आहे. आधुनिक युगात विस्मृतीत गेलेले जाते आज पुन्हा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग बनले असून, "जुनं ते सोनं" या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा मावळच्या मातीतून अनुभवायला मिळत आहे.


0 Comments