मावळ जनसंवाद: दरवर्षी गुढीपाडव्याच्या आधी शेतीचे नवे साल म्हणून सालगड्याचा शोध घेऊन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बोलणी केली जाते. सालगडी कामावर ठेवण्यासाठी बोली करतो. मात्र, वाढती महागाई लक्षात घेऊन सालगडी शेतात काम करण्यास नकार देत आहे. सव्वा लाखाच्या पुढे सालगड्याचा करार गेला आहे. पैसे देऊनही सालगडी मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुडी पाडव्याच्या दिवशी शेतीच्या कामाला सुरुवात केली जाते. गुढीपाडवा जवळ आला की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आपल्या शेतीच्या कामाकरिता शेतात सालगडीची शोध सुरू होतो. गुढीपाडवा सणाला शेतातील सालगड्याचा करार होऊन शेतीकामाला सुरुवात केली जाते. यावर्षी सालगड्याचा वर्षाचा पगार दीड लाखापर्यंत गेला आहे. गतवर्षी एक लाख ते सव्वा लाख रुपयांपर्यंत सालगड्याचा करार गेला होता. यंदा मात्र यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढती महागाई लक्षात घेता आम्हाला परवडत नाही, असा सूर सालगड्यांतून निघत आहे.वर्षभराचा कौटुंबिक संसार या पैशातून चालवला जातो. सतत पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना फटका, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सालगाड्याचा पगार परवडत नसून, शेतीतील उत्पन्नही घटत चालले आहे. यामुळे शेतकरी आपली शेती भागिदारीने व अर्धलीने देत आहेत.
शेतकऱ्यांना शेतातील कामाला सालगडी मिळत नसल्याने बैलजोडी, पशुधनाची विक्री करून ट्रॅक्टरवरील यांत्रिकीकरण शेतीकडे वळावे लागत आहे. त्यामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढत असून, ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. सालदाराची संख्या कमी झाल्याने शेतीच्या कामाकरिता परराज्यातून सालगडी आणावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. लावलेला खर्चही शेतीतून निघालेला नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अगोदरच शेती हा व्यवसाय तोट्याचा झाला आहे. लागवड केलेला खर्चही निघत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. यामुळे यावर्षी सालगडी ठेवण्याची मनस्थिती नाही. सखाराम नामदेव चोपडे शेतकरी, कोंडिवडे ना.मा.
0 Comments