मावळ जनसंवाद: वाढते औद्योगिकीकरण,भौतिक सुखसोयी व रोजगाराचे पर्याय यामुळे ग्रामीण भागातील युवा पिढीची शहरांकडील ओढ वाढत आहे. परिणामी, शेतीच्या कामाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत असल्याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. ऐन सुगीत मजुरांच्या तुटवड्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याचा बहुमान केला जातो. ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीभोवतीच शेतकऱ्याचे अर्थकारण फिरते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील तरुणाई शिक्षण व रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहे. त्यामुळे शेतीसाठी मजुरांचा तुटवडा भासत असल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. मावळ तालुक्याच्या पूर्वभागात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दिवाळीपूर्वीच ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा पेरणी केली जाते. ही पिके सध्या काढणीस आली आहेत. काही ठिकाणी सुगीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, काढणी व कापणीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. वेळेत काढणी झाली नाही तर गहू, हरभरा जागेवर गळती होऊन उत्पादनाला फटका बसणार आहे. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, पशुपक्ष्यांचा उपद्रव यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या धान्याचा घास हिरावला जाण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दरम्यान
सध्या सुरुच्या हंगामातील ऊस लागणीला वेग आला आहे. उन्हाच्या तीव्रतेचा ऊस बियाणे व अंकुरलेल्या कोंबांनाही फटका बसतो. त्यामुळे तापमानात अधिक वाढ होण्यापूर्वीच लागण पूर्ण करून ती रोपे जोर धरणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सध्या काही भागात ऊस लागणीची लगबग सुरू आहे. मात्र, त्यासाठी देखील मजूर तुटवडा भासत असून, अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे रोपांची लावण केली जात असून, रोपवाटिका चालकांकडूनच मनुष्यबळ पुरवठा केला जात आहे.(परगावच्या मजुरांसाठी प्रवासाचा भुर्दंड...
गावात मजूर मिळत नसल्याने परिसरातील परगावच्या मजुरांची मदत शेतीच्या कामासाठी घेतली जात आहे. मात्र, परगावाहून येत असल्याने येणे व जाण्याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागत आहे. शिवाय प्रवासाचा वेळही त्यांच्या कामाच्या वेळेतच मोजला जात असल्याने परगावच्या मजुरांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र, गरज असल्यामुळे परगावाहून ट्रॅक्टर-ट्रॉलीतून या मजुरांना कामासाठी आणले जात आहे)
0 Comments