मावळ जनसंवाद, दि. १२ (वार्ताहर) : मावळ तालुक्यातील नाणे मावळ परिसरात पाण्याअभावी भातपिके करपू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. मोठ्या कष्टाने, खर्च करून आणि वर्षभराच्या उत्पन्नाची आशा ठेवून उभे केलेले भातपीक डोळ्यांदेखत करपू लागल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
मावळ तालुका भातशेतीसाठी प्रसिद्ध असून, परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भातपिकावर अवलंबून आहे. पावसाळ्यात शेताची मशागत, भातलागवड, खते, औषधे आणि मजुरी यांसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. मात्र, पिकांना आवश्यक वेळी पाणी मिळाले नाही, तर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण होते.
सध्या पाण्याअभावी भातपिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची चिंता सतावत आहे. भातपीक चांगले आले, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि वर्षभराचा खर्च भागेल, या अपेक्षेने शेतकरी शेतीत मेहनत घेत असतात. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळे पीक धोक्यात आल्यास त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर संबंधित कृषी विभाग आणि प्रशासनाने नाणे मावळ परिसरातील भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा. पाण्याची उपलब्धता तपासून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जपण्यासाठी आणि भातपीक वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



0 Comments