मावळ जनसंवाद, दि. १ :
आपल्या गावाकडं संक्रांती जवळ आली की एक वेगळंच चित्र दिसायला लागतं. डोंबाऱ्याचा खेळ पाहिला की सण आल्याची चाहूल लागते. ही परंपरा आजही काही खेडेगावांमध्ये श्रद्धेने आणि कष्टाने जपली जात आहे.
या खेळात एक महिला डोक्यावर पेटी घेऊन गावात फिरताना दिसते. त्या पेटीमध्ये देवाचा फोटो ठेवलेला असतो. गावकरी त्या देवापुढं नमस्कार करून श्रद्धेने तांदूळ, डाळ, तेल तर कधी थोडे पैसे देतात. महिलेकडे एक पारंपरिक वाद्य असते, ते वाजवत ती गावभर फिरते आणि काखेत पिशवी घेतलेली असते.
तिच्यासोबत एक पुरुष असतो. त्याच्या हातात चाबूक असतो. अंगावर कपडे नसून फक्त कमरेला रंगीबेरंगी कापडाच्या रिबिनी बांधलेल्या असतात. ही जोडी गावोगावी फिरत पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी पार करते. मिळालेल्या धान्याच्या आणि पैशाच्या आधारावरच त्यांचा संसार चालतो.
आजचा काळ बदलला असला, तरी या लोकांच्या जीवनात अजूनही परंपरेचं आणि श्रद्धेचं महत्त्व टिकून आहे. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे फक्त करमणूक नाही, तर गरिबीशी झुंज देत जपलेली संस्कृती आहे. अशा परंपरा टिकल्या तरच आपल्या गावची ओळख आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील, अशी भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी — श्री. अतुल तुकाराम चोपडे पाटील
नाणे मावळ
📞 संपर्क : ९८२३९३५४२४


0 Comments