Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

गावरान झाडांच्या संवर्धन काळाची गरज

मावळ जनसंवादसर्वसामान्य जनतेसह सर्वांच्या पसंतीला उतरणारे व ग्रामीण भागातील लोकांचे विशेष फळ म्हणून ओळख असलेला गावरान आंबा यंदा भाव खाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डोंगरी भागात गोटी आंबा आणि सीताफळ या दोन फळांची ओळख ही गावरान मेवा म्हणून आहे. चालू हंगामात हा गावरान आंबा दुरापास्त होण्याची वेळ उद्भवण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण गोटी आंब्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे आंब्याचे उत्पादन घटत असून, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परंपरागत पद्धतीने वाढणारा गावरान गोटी आंबा कोणत्याही रासायनिक खताशिवाय नैसर्गिकरीत्या जोमाने फुलतो आणि धारणाही करतो. मात्र, गत दोन वर्षांपासून या आंब्याच्या झाडांना करप्या रोग आणि वाळवीचा प्रादुर्भाव वाढल्याने सदर झाडे हळूहळू नष्ट होऊ लागली आहेत. परिणामी, शेतकरी झाडे तोडून टाकत आहेत आणि हा गावरान मेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गोटी आंबा केवळ चवदारच नाही, तर कैरी अवस्थेत लोणच्यासाठी उत्तम तर पूर्ण पिकलेला गोडसर आणि आरोग्यदायी असतो. पारंपरिक भारतीय आहारात या आंब्याला विशेष स्थान आहे. मात्र, योग्य संवर्धनाच्या अभावामुळे तो संपुष्टात येण्याची भीती आहे.

गोटी आंबा झाडाला नोव्हेंबर-डिसेंबर, जानेवारी-फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात फळधारणा होते. मात्र, करप्या रोग आणि वाळवी यामुळे २०-३० टक्के झाडे कमकुवत होत आहेत. शेतकऱ्यांना यावर उपाय करण्यासाठी कृषी विभागाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.मावळ तालुक्यात काही भागात गोटी आंबा प्रसिद्ध आहेत. परंतु, नवीन कृषी योजना फक्त व्यावसायिक आंबा बागांवर केंद्रित असून, गावरान झाडांच्या संवर्धनासाठी कोणतेही अनुदान किंवा मार्गदर्शन उपलब्ध नाही.कृषी विभागाने नवनवीन प्रयोग करण्याऐवजी पिढ्या‌न्पिढ्या जोपासली गेलेली गावरान आंबा झाडे टिकवण्यासाठीही उपाययोजना केल्या पाहिजेत. सेंद्रिय पद्धतीने झाडांचे संरक्षण, कीड आणि रोग व्यवस्थापन यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सरकारकडून अनुदान मिळाल्यास शेतकरी गोटी आंब्याच्या झाडांची निगा राखू शकणार आहेत. तसेच या झाडाचे संवर्धन होण्यास मदत होईल.

(संवर्धनासाठी अनुदानाची गरज शासन विविध फळबाग योजना राबवत असताना गावरान गोटी आंबा आणि सीताफळ यासारख्या झाडांसाठीही अनुदान देणे आवश्यक आहे. तसेच, शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने झाडांचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करावे, जेणेकरून हा गावरान मेवा हद्दपार होण्यापासून वाचेल. मावळ कृषी विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय कीड व्यवस्थापन आणि झाडांचे संवर्धन यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.)


Post a Comment

0 Comments